मतदान आणि आनंदाश्रू

मी सुयश काटकर. एफ. वाय. बी. एस्स. सी.
मागच्या आठवड्यात पेपरमध्ये एक छोटीशी बातमी वाचली - मुंबई अतिरेकी हल्यानंतरची एक उपाययोजना म्हणून गेट-वे च्या समुद्रातल्या सगळ्या होडी, बोटी हटवण्यात येणार आहेत म्हणे! का? तर अतिरेकी समुद्रातून आले म्हणून! यडचाप आहेत का हे राजकारणी, पोलीस? बोटी हटवणार काय... त्याच नियमानं मग लोकलगाड्यांत बॉंबस्फोट होतात म्हणून लोकलगाड्या बंद करा किंवा WTC वर विमानं धडकली म्हणून अमेरिकेतली विमानं बंद करा! अरे, काय हे! इनको कोई लेके जाओ या ऽ ऽ र! बोटी बंद केल्या तर मग लोकांनी एलिफंटा केव्हज पहायला जायचं कसं? तो तुमचा सांस्कृतिक ठेवा की काय आहे ना? अरे, साधा विचार करा... बोटी बंद झाल्या, एलिफंटाची वर्दळ कमी झाली की हेच अतिरेकी एक दिवस तिथेही आपला अड्डा बनवतील! आणि उद्या, म्हणे, समुद्रात तुम्ही शिवाजीमहाराजांचं भव्य वगैरे स्मारक उभारणार आहात! मग तिथेही लोकांनी कसं जावं असं तुमचं म्हणणं आहे? पोहत की उडत?
कॉलेज कॅंटीनमध्ये सगळ्यांना ही बातमी सांगितली. ते ऐकून सम्या लगेच उठला आणि म्हणाला, "चला, बिना बोटींचा गेट-वे चा समुद्र कसा दिसतो ते बघून येऊ"! हा सम्या सुद्धा जरा मॅडच आहे. प्रत्येक गोष्टीत याला टूरिझम दिसतं! गेट-वे ला मेणबत्त्या लावायला जायची टूम पहिली यानंच काढली. ’अंधार पडल्यावर जाऊ. म्हणजे जरा मेणबत्त्या छान दिसतील’ म्हणे! आयला, त्याच्या या वाक्यावर सगळ्यांनी धुतला त्याला!
त्यादिवशी लेक्चर्स साडेचारला संपली. अंधार पडेपर्यंत कुठेतरी टी. पी. करायचा असं ठरलं. पण क्षिप्रानं सुचवलं की आधी मेणबत्त्या उत्पन्न करा कुठूनतरी मग टी. पी. चं ठरवा. (ही क्षिप्रा फडतरे सतत काहीतरी काकूबाईसारखे सल्ले देत असते सगळ्यांना. म्हणून आम्ही तिला फडतरे आँटी म्हणतो.) कॉलेजपासून जवळच शीतलच्या काकांचं दुकान आहे तिथे सगळे गेलो मेणबत्त्या आणायला. ’सगळ्यांच्या हातात एकसारख्याच मेणबत्त्या पाहिजेत’ अशी ऍश, आदिती, सोना सगळ्यांची ऑर्डर होती. तर, च्या मारी, आम्ही पंधरा-वीस जण (आणि जणी) गुणीले दोन इतक्या एकसारख्या आकाराच्या मेणबत्त्याच नव्हत्या त्यांच्या दुकानात. कुठून कुठून त्या पैदा करेपर्यंत अंधार पडला सुद्धा. टी. पी. म्हणून सिनेमॅक्सला जाऊन आईस्क्रीम हादडायचा प्लॅन रद्द केला शेवटी.
गेट-वे ला पोचलो. तिथे ही ऽ ऽ गर्दी जमली होती. कॉलेज क्राऊडच जास्त होतं. झेवियर्सचा एक मोठा गृप आला होता - एकदम कडक तयारीत... सगळ्यांच्या एकसारख्या कॅप्स, एकसारखे टी-शर्टस, मोठमोठे बॅनर्स! (त्यांचं बरं आहे, कॉलेजपासून गेट-वे जवळ आहे. आदल्या दिवशी गुपचूप येऊन पाहून गेले असतील तिथे कोण-कोण काय काय करतं ते! न्यूज चॅनल्सवालेही त्यांच्याच मागे मागे होते फक्त!)
नित्या आणि मॅडीनं आमच्या सगळ्यांच्या मेणबत्त्या पेटवल्या। मुली सगळ्या लगेच सेंटी व्हायला लागल्याच होत्या. अभ्याच्या मते शहिदांना श्रद्धांजली म्हणून मेणबत्त्या लावायच्या तर त्या कमीतकमी ताजच्या मेन गेट समोर तरी लावायला पाहिजेत. (हा अभ्या बारावीच्या परिक्षेनंतर आई-वडिलांबरोबर अंदमानच्या टूरला गेला होता आणि त्यांच्या टूर कंपनीनं त्यांचं PreTour Get-to-gether ताजच्या एका हॉलमध्ये ऍरेंज केलं होतं. तेव्हापासून हा उगीचच ताज-ताज करत असतो! जणू रतन टाटा त्यांच्या मृत्युपत्रात ताज याच्याच नावावर करणार आहेत!!)
... ते तिथले सगळे बॅनर्स पाहिले, घोषणा ऐकल्या, दिल्या... अतिरेकी हल्ल्याची टी.व्ही. वरची सग्गळी दृश्यं परत आठवली... आणि एका क्षणी, यार, खरंच डोळे भरून आले! लष्कराचे जवान, एन. एस. जी. कमांडोज - ग्रेट लोकं यार! आपली मागाहून येऊन मेणबत्त्या लावायचीच लायकी...
आपले डोळे भरून आले याचं नंतर माझं मलाच आश्चर्य वाटत होतं! ओबामांच्या शपथविधीदिवशी सुद्धा गर्दीत उभं राहून कितीतरी जण रडत होते. त्या सर्वांना त्या क्षणी काय वाटत असेल त्याची - आता - मी कल्पना करू शकतो.

हिलरी क्लिंटन ऐवजी ओबामांना उमेदवारी दिली म्हणून कॉलेजमधल्या मुली आधी ओबामांना जाम खुन्नस द्यायच्या. "हिलरी कसली ग्रेसफुल दिसते! तिच्या जागी हा का ऽ य, बोअर! " वगैरे... या मुली तर ना च्यायला कपडे, दागिने, फॅशन यापलिकडे जातच नाहीत कधी! मग मुला-मुलींच्यात ओबामा की हिलरी क्लिंटन अशी वादावादी सुरू व्हायची.
’डी’ डिव्हीजनला दोन नायजेरीयन विद्यार्थी आहेत. सम्या त्या दोघांना ’डबल ओबामा’ म्हणतो.
परवा असेच पोर्चच्या पायऱ्यांवर गप्पा टाकत बसलो होतो. तेवढ्यात ते दोघं लांबून जाताना दिसले। तर हा पटकन म्हणाला, "अरे! मला वाटलं आता हे ओबामा सुट्टी घेतील, तिकडे ते ओबामा प्रेसिडेंट झाले ना! "... इस सम्या का कुछ नहीं होने वाला!!
"ए, गप ना च्यायला! प्रेसिडेंट बदलले म्हणून सुट्टी घेतं का कुणी? " - वेणूनं त्याला मूर्खात काढलं.
पण खरंच, अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांना दसरा-दिवाळी आल्यासारखं वाटत असेल का खरोखर? आनंदानं वेडं व्हावं, जणू एखादा सण साजरा करतोय असं वाटावं - इतका त्यांच्या आयुष्यात खरंच फरक पडणार आहे का? उद्या समजा एखादी मराठी व्यक्ती पंतप्रधानपदी बसली तर आपल्याला तसं वाटेल का? त्या शपथविधीच्या वेळी आपलेही डोळे भरून येतील का? विशाल गोगटे, आमचा सी.आर., म्हणतो - "ते तसं खरंच होईल का हे पहायचं असेल तर आधी जाऊन मतदान करायला पाहिजे". यंदा प्रथमच मतदान करायला मिळणार म्हणून सर्वात जास्त कोण खूष असेल तर हा गोगट्या!
नुकतीच आमची नवी मतदार ओळखपत्रं आली. मी, आई आणि बाबा - आमच्या तिघांपैकी एकाच्याही ओळखपत्रात एकही चूक नव्हती ते पाहून ’मला गहिवरून आलं’ असं बाबा गमतीनं म्हणाले! (तिघांचीही ओळखपत्रं घेऊन बाबांनी सुजी ला बसवलं होतं चुका शोधायला.)
थोडक्यात काय, तर डोळे भरून येण्यासाठी निवडणुका, शपथविधी इतकं होईपर्यंत थांबायचीही गरज नाही...

... तरी, गोगट्या सतत म्हणत असतो म्हणूनही मला वाटत असेल कदाचित, पण मी यंदा मतदान करणारच आहे. मराठी व्यक्ती पंतप्रधान होईल का, तेव्हा आपले किंवा किमान आपल्या आई-बाबांचे डोळे भरून येतील का ते पाहता येईल तेव्हाचं तेव्हा...

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)