पु. ल. आणि आजकालची मुलं

स्त्री मासिकाच्या जुलै-२०१२च्या अंकात हा लेख प्रकाशित झाला.


----------------------------------------------------


लहानपणी शाळेत असताना जून महिन्यात नवीन वर्षाची पाठ्यपुस्तकं आणली की त्यातलं मराठी (बालभारती)चं पुस्तक मी सगळ्यात आधी अधाश्यासारखं वाचून काढायचे। इयत्ता सातवी किंवा आठवीत मराठीच्या पुस्तकात ’परोपकारी गंपू’ असा एक धडा होता. तो मला वाचल्यावाचल्याच अतिशय आवडला होता. आमच्या सुदैवानं तेव्हा शाळा-शिक्षकही चांगले होते. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावरही बाई तो धडा केव्हा शिकवायला घेतील याची मी आतुरतेनं वाट पाहिल्याचं मला आजही चांगलं आठवतंय. ’पु. ल. देशपांडे’ या असामीशी ती माझी पहिली भेट होती. आमच्या अजून एका मोठ्या सुदैवानं त्या धड्याच्या सुरूवातीलाच कंसात एक टीप दिलेली होती की हा धडा पु. ल. देशपांडे लिखित ’व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातून घेतलेला आहे. वाचनालयातून ताबडतोब आणून तेही पुस्तक मी अधाश्यासारखं वाचून काढलं होतं...
त्याच्या पुढच्याच वर्षी (बहुतेक इयत्ता नववीत) ’अपूर्वाई’ पुस्तकातला एक उतारा धडा म्हणून होता. सविस्तर उत्तरे लिहा, संदर्भासहित स्पष्टीकरण द्या, लेखकाचा दृष्टीकोन स्पष्ट करा अश्या सगळ्या रुक्षपणाला तो धडा पुरून उरला आणि नववीचं वर्ष सरता-सरता ’अपूर्वाई’नं मनात कायमचं घर केलं. अश्या रीतीनं पु. लं. च्या भक्तगणांत मी तेव्हा जी सामिल झाले त्याचं सगळं श्रेय त्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांना जातं.

... काळ एका पिढीनं पुढे सरकला...
माझ्या मुलाची शाळाप्रवेशाची प्रक्रिया नुकतीच पार पडली होती आणि आमचं वास्तव्य महाराष्ट्राबाहेर असल्यामुळे त्याला नाईलाजास्तव इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावं लागलं होतं। घरात एका कार्यक्रमानिमित्त जमलेल्या पाहुणेमंडळींत ’इंग्रजी की मराठी माध्यम’ याच विषयावर गप्पा रंगलेल्या होत्या.
कुणीतरी बोलायच्या ओघात म्हणालं, "... इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आपल्यासारख्या घरातल्या १३-१४ वर्षांच्या मुलांना मग पु। लं। चं लेखनही उमगत नाही! "...
मी एकदम चमकले। मुद्दा एकदम बरोबर होता... त्यावर काही दुमत होणं शक्यच नव्हतं! मनात आलं - आपल्या मुलाच्याही बाबतीत असंच झालं तर...?? मला ती कल्पनाच सहन झाली नाही आणि मी पद्धतशीरपणे कामाला लागले।
मुलाच्या सुदैवानं घरात बोलताना मराठी भाषेचा(च) वापर होता. पण आता त्याला मराठी भाषा वाचायला शिकवणं गरजेचं होतं. मी त्याला अ, आ, इ, ई शिकवलं, बाराखडी शिकवली, त्याच्या वयानुसार दरवर्षी महाराष्ट्रातून मराठीची प्राथमिक पाठ्यपुस्तकं आणत गेले. ती मी त्याला रोज वाचून दाखवायचे... उद्दीष्ट एकच - मोठं झाल्यावर पु. लं. ची पुस्तकं त्यानं मारून मुटकून, केवळ मी म्हणते म्हणून नाही तर आवडीनं वाचली पाहिजेत. त्याच्यासाठी मराठी गोष्टींचीही भरपूर पुस्तकं घेतली. मराठी वाचनाची त्याला गोडी लावली, म्हणी-वाक्प्रचार यांची ओळख करून दिली... उद्दीष्ट एकच - मोठं झाल्यावर ’... मी पुढले दोन तास उजव्या हातात घरची आणि डाव्या हातात बाजारची वीट घेऊन त्याचे घर पाहत हिंडत होतो. एखाद्या गोष्टीचा कंटाळा येण्याला वीट येणे का म्हणतात ते त्या दिवशी कळले’ या पु. लं. च्या बहारदार शाब्दिक कोटीला त्यानं उस्फूर्त दाद दिली पाहिजे; ’मला वटवृक्षाची उपमा दिलेली पाहून उगीचच माझ्या नाकाखाली एक पारंबी लोंबायला लागली आहे असे मला वाटले... ’ हे वाक्य वाचून त्यानं पोट धरून हसलं पाहिजे...

अशीच सहा-सात वर्षं मी माझ्या नकळत प्रयत्न करत राहिले। तरी, इंग्रजी माध्यमातल्या रंगीबेरंगी, चित्रमय पाठयपुस्तकांची सवय लागल्यामुळे असेल पण माझा मुलगा पु. लं. ची पुस्तकं ’वाचायला’ इतका उत्सुक नसायचा. मग मी त्यांच्या कॅसेटस, सी. डी. ज आणल्या, त्याच्यासोबत बसून त्या एकेकदा ऐकल्या आणि आज मला आनंदानं, मनापासून संगावंसं वाटतं की ’असा मी असामी’चे तीनही भाग, सखाराम गटणे, मी आणि माझा शत्रुपक्ष इ. ची त्यानं गेल्या सहा-आठ महिन्यांत अगणित पारायणं केली आहेत!...
अजूनही काही विनोद, शाब्दिक कोट्या त्याच्या डोक्यावरून जातात, ’अंतू बर्वा’ किंवा ’रावसाहेब’ मधले नकळत काढलेले चिमटे त्याला म्हणावे तितके जाणवत नाहीत, धोंडो भिकाजी जोशींनी पार्ल्यातल्या मावशीचा पत्ता रस्त्यातल्या सायकलवाल्याला विचारल्यावर तो जेव्हा "कोनला तरी घाटीला इचारून घ्या" असं म्हणतो तेव्हा त्या उत्तरातली खोच माझ्या मुलाला पूर्णपणे कळतेच असं नाही पण तो इंग्रजी माध्यमातल्या शिक्षणाचा side effect आहे असं मला वाटतं.त्याची पिढी ’म्हैस’मधल्या एस. टी. प्रवासाच्या वर्णनाची किंवा बटाट्याच्या चाळीच्या वर्णनाची आपल्याइतकी मजा घेऊ शकत नाही पण त्यात त्या पिढीचाही दोष नाही. ऐसपैस घरांत राहणारे आणि वातानुकुलित गाड्यांमधून प्रवास करणारे आपणच त्याला कारणीभूत आहोत! पण तरीही, आज ’असा मी असामी’मधला ’शंकऱ्या’ हे त्याचं आवडीचं पात्र आहे, "कुळकर्ण्याने तो हॉल एक-बाय-अर्धाचा आहे असे म्हटले असते, तरी मी "अरे वा! "च म्हटले असते" या वाक्याला आज तो पोट धरधरून हसतो।

हळूहळू पु। लं. च्या भक्तगणांत तो पण सामिल होईल असं आत्ता तरी दिसतंय. माझ्या लहानपणी जे काम बालभारतीच्या पुस्तकानं केलं ते माझ्या मुलासाठी मी केलं यातच मला समाधान आहे! कारण, हे कुणीही कबूल करेल की ही आजकालची मुलं जर ’व्हिंदमाता’चा उखाणा ऐकून खळखळून हसली नाहीत तर आपली मायमराठी हमसून हमसून रडेल आणि...

’डायवर कोन हाय? ’ या प्रश्नावर त्यांचा जीव जडला नाही तर ते महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आपल्याला माफ करणार नाही...

Comments

Hi...
Tumachyaa yaa kaamagiri baddal tumach wiSheSh kautuk karaaw as waatat...

Kharach tumachyaa saarakhach baryaach lokaanaa ya gosTibaddal wichaar karaayalaa hawaa...
साधक said…
मस्त लिहिलंत. आमची मुलं इंग्रजी माध्यमात जातात याचा बाष्कळ अभिमान बाळगून त्यांना मराठी वाचता येत नाही या गोष्टीला पाठीशी घालणारे काही पालक मी पाहिले आहेत. मला त्यांची चीड येते.आणि त्या बद्दल त्यांना फारसं काही वाटत नाही. जे जे उत्तम मराठीत आहे ते ते आपल्या लेकराला उमजावे या साठी प्रयत्न करणारे तुमच्या सारखे बाप धन्य होत. सर्व जण तुमच्या सारखा विचार करु लागले तर मग चिंता नाही...
माझे कित्येक इंग्रजी माध्यमाचे मित्र मराठी माध्यमाचा नाही म्हणून मला मराठी वाचता येत नाही असं सांगतात.
अरे त्या साठी कधी प्रयत्न केलेस का लेका? असं मी त्यांना नेहमी विचाराय्चो...
खूपच छान आहे तुमचा प्रयत्न. आमचा दिवटा/टी काय करील कोण जाणे.
साधक said…
This comment has been removed by a blog administrator.
दिपक said…
सुंदर लेख !
एका पु.ल.प्रेमी ला जन्म दिल्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच. इंग्रजी भाषेबरोबर वेस्टर्न संकृतीचे आक्रमण होत आहे त्यात मराठी साहित्य संकृती आपण टिकवायला हवीच.

पु.ल. च्या प्रेमाखातर आणि पु.लं.च्या लिखाणाबरोबर त्यांची बर्‍याच ठिकाणी झालेली भाषणे मी एका ब्लॉगवर जमवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आजकालच्या पिढीला त्याचा लाभ घेता येईल.
पु.ल. प्रेम http://cooldeepak.blogspot.com

दिपक
दिपक said…
This comment has been removed by a blog administrator.
Unknown said…
अप्रतिम...!
Unknown said…
This comment has been removed by a blog administrator.

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)