... गेला सूर्यास्त कुणीकडे!

"काय अप्रतिम आलाय फोटो!... रंग कसले सॉलिड दिसतायेत!... मावळत्या सूर्याचा केशरी गोळा बघ ना, काय छान वाटतो फोटोत...!... आणि त्याचं पाण्यातलं प्रतिबिंब... " मी आनंदून म्हणाले।
यावर, माझ्या एकुलत्या एक श्रोत्याचा म्हणजे माझ्या मुलाचा चेहेरा कोराच! मला नाही म्हटलं तरी रागच आला। आदल्याच दिवशी मी काढलेला तो सूर्यास्ताचा फोटो इतका सुंदर आला होता पण जरा कौतुक होईल तर शप्पथ!
"मी काढलाय ना हा फोटो! नाहीच आवडणार तुला... तू काढलेल्या फोटोंचं मात्र मी अगदी तोंडभरून कौतुक करायचं... " मी जरा घुश्श्यातच त्याला म्हटलं.
पण पठ्ठ्या चेहेऱ्याच्या कोऱ्या कागज पे या फोटोच्या प्रशंसेचं नाम लिखायला काही तयार नव्हता। उलट मगाशी त्या कोऱ्या कागदावरच्या आडव्या ओळी तरी किमान दिसत होत्या, माझ्या या वाक्यानंतर त्या पण गायब झाल्या।
"छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंदच घेता येत नाही तुम्हाला... " मी माझी टेप पुढे सुरू ठेवली।
"आई, आजपर्यंत अश्याच किमान शंभर-दीडशे छोट्या गोष्टींचा आनंदही घेतलाय आणि कौतुकही केलंय, बरं का! " चेहेऱ्याच्या कोऱ्या कागदावर अखेर एक वाक्य खरडून तो तिथून उठून टी। व्ही। बघायला निघून गेला।
’आजकाल हा मुलगा आईलाही सुनवायला लागलाय... एकदा पुन्हा बौद्धिक घेतलं पाहिजे याचं... ’ मी त्याच्या दिशेनं एक निषेधाचा कटाक्ष टाकला आणि पुन्हा डोळे भरून फोटो-निरीक्षणाचं काम पुढे सुरू केलं...

... माझं सूर्यास्तप्रेम अगदी जगजाहीर जरी नसलं तरी घरजाहीर नक्कीच आहे। मला सूर्यास्त आवडतो आणि सूर्यास्ताचे फोटो काढायलाही खूप आवडतं। तसं माझं सूर्योदयाशीही काही वाकडं नाहीये. सूर्योदयाच्या वेळीही दृश्य तितकंच सुंदर असतं, वातावरणात एक वेगळीच प्रसन्न छटा असते... असं मी पण ऐकलंय!... पण त्याचे फोटो काढण्याच्या कामाला मी आजपर्यंत हात घातलेला नाही... सूर्योदयाचा फोटो काढायचा म्हणजे सकाळी लवकर उठणं आलं, उजाडण्यापूर्वीच घराबाहेर किंवा निदान घराच्या गच्चीवर जाणं आलं... आणि माझं घोडं अडतं ते तिथे! भल्या पहाटे उठणार कोण आणि कसं?! (एक वेळ मी पर्वतीची टेकडी दोन वेळा चढून उतरेन पण भल्या पहाटे ठरलेल्या वेळी बरोब्बर उठणं मला या जन्मी शक्य नाही!) बरं, जरा उठायला किंवा बाहेर पडायला उशीर झाला की संपलं... प्रसन्न छटा, सहस्त्ररश्मी, सोनेरी सकाळ वगैरे गोष्टी आपल्या डोळ्यांदेखत आपल्याला टाटा करून निघून जातात... मग कसला फोटो आणि कसलं काय!
त्यापेक्षा, आपला सूर्यास्त बरा! एकतर फोटो काढायला तो आपल्याला भरपूर अवधी देतो, शिवाय तेव्हाचा उजेड, आकाशातले रंग, शांत भासणारा सूर्याचा गोळा... ही सगळी तयारी आधीपासूनच झालेली असते। त्यामुळे फोटो काढणाऱ्याला फार काही करावं लागतच नाही... एक छानसा फोटो अगदी सहजपणे निघतो... (आणि काढलेल्या फोटोचं कौतुकही होतं!) आणि सर्वात मुख्य म्हणजे तिथे पहाटे लवकर उठण्याची अट नसते!!
सूर्यास्ताचे फोटो काढण्यासाठी माझी सर्वात आवडती जागा म्हणजे समुद्रकिनारा! तिथे सगळ्या गोष्टी ज्या प्रकारे जुळून येतात त्याला तोड नाही... आणि मला एकदम दमणच्या समुद्रकिनाऱ्यावर मी काढलेला माझा सर्वात आवडता सूर्यास्ताचा फोटो आठवला। लगबगीनं उठून मी दिवाणाखालची जुन्या फोटो-अल्बमची बॅग बाहेर काढली. त्यातून तो अल्बम आणि त्यातला तो फोटो काढला. काय अप्रतिम आला होता तो फोटो!... रंग कसले सॉलिड दिसत होते!... मावळत्या सूर्याचा केशरी गोळा काय छान वाटत होता फोटोत...!... आणि त्याचं पाण्यातलं प्रतिबिंब... वा! पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला मला तो फोटो इतक्या दिवसांनी बघून!...
"पुनःप्रत्ययाचा आनंद...! " - त्यानंतर गोव्याला समुद्रकिनाऱ्यावर असाच एक झकास फोटो काढल्यावर मी हेच म्हणाले होते... तर नवऱ्यानं "पुनःप्रत्ययाचा आनंद? ते काय असतं बुवा? " असं विचारून माझ्या सळसळणाऱ्या उत्साहाखालचा गॅस बंद करून टाकला होता... नवरा हा प्राणी अश्या वेळेला पचका करायला हमखास हजर असतोच...! नवऱ्याच्या त्या प्रश्नाला पुन्हा एकदा नाक मुरडत मी तो गोव्याचा अल्बम काढला। तिथे काढलेले सूर्यास्ताचे ४-५ फोटो मी अल्बमच्या सुरूवातीलाच लावलेले होते. माझ्या एका अश्याच सूर्यास्त-आणि-फोटोप्रेमी भावाला हे गोव्याचे फोटो इतके आवडले होते की तो हा अल्बमच घेऊन गेला होता त्याच्या मित्रांना दाखवायला. एक-एक फोटो काय अप्रतिम आला होता!... रंग कसले सॉलिड दिसत होते!... मावळत्या सूर्याचा केशरी गोळा काय छान वाटत होता प्रत्येक फोटोत...!... आणि त्याचं पाण्यातलं प्रतिबिंब... वा!
’पचका’वरून आठवलं - माउंट अबूला प्रथम गेलो होतो तेव्हा मारे जोरात फोटो काढण्यासाठी म्हणून वेळेच्या आधीच मी ’सनसेट पॉईंट’ला पोचले, तर त्यादिवशी सूर्यास्ताच्या वेळी आकाश नेमकं ढगाळलेलं होतं... माझा असला पचका झाला होता! माउंट अबूला जायचं आणि सनसेट पॉईंटवरून फोटो न काढताच परत यायचं? ये बात हजम नहीं हो रही थी... म्हणून ३-४ वर्षांनी आम्ही परत गेलो होतो तिथे। त्यावेळी मात्र ढगांनी कृपा केली होती. शिवाय तेव्हा मी काय-काय अभिनव(?) प्रयोग केले होते... माझ्या मुलानं आपल्या हाताच्या दोन्ही पंजांत सूर्याचा गोळा अलगद पकडलाय असा एक फोटो काढला होता. (लहान असल्यामुळे माझा मुलगा तेव्हा माझं ऐकायचा... मी सांगेन तश्श्या पोझेस देऊन फोटोसाठी उभा रहायचा!)... त्याला ’आ’ करून उभं रहायला सांगून त्यानं जणू तोंडात सूर्याचा गोळा धरलाय असाही एक फोटो काढला होता. "तो जांभई देतोय आणि त्याच्या तोंडातून ड्रॅगनसारखा जाळ बाहेर पडतोय असं वाटतंय या फोटोत! " - इति नवरा!... दुसरं कोण असणार! (जातीच्या कलाकाराला आप्तस्वकीयांकडूनच सर्वात जास्त टीका सहन करावी लागते असं जे म्हटलं जातं ते काही खोटं नाही.)
गोव्याचा अल्बम बाजूला ठेवून मी तो अल्बम काढला। एक-एक फोटो काय अप्रतिम आला होता!... रंग कसले सॉलिड दिसत होते!... मावळत्या सूर्याचा केशरी गोळा काय छान वाटत होता प्रत्येक फोटोत!... आणि त्याचं पाण्यातलं प्रतिबिंब... नाही, नाही! तिथे पाणी आणि प्रतिबिंब मात्र नव्हतं!...

... ऊटी झालं, श्रीनगर झालं, माथेरान-महाबळेश्वर झालं... आता या प्रत्येक जागीच सनसेट पॉईंट नामक ठिकाण स्थलदर्शनात समाविष्ट असतं त्याला मी तरी काय करणार? मग माझ्यासारख्या सूर्यास्तप्रेमी पर्यटकाला त्या प्रत्येक सनसेट पॉईंटवर जाऊन फोटो काढावेसे वाटणारच ना!... अशीच माझी सूर्यास्त-फोटोसंपदा वाढत गेली होती।सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा देत देत एक-एक अल्बम बाहेर निघत होता. बघताबघता त्या बुडणाऱ्या सूर्याप्रमाणे मी पण सगळ्या अल्बम्सच्या गराड्यात बुडून गेले...

अचानक, एखाद्या चित्रपटात नायक अथवा नायिकेचं दुसरं मन कसं आरश्यातून वगैरे त्यांच्याशी बोलायला लागतं, तसं माझं दुसरं मन गळ्यात कॅमेरा लटकवून समोरच्या भिंतीतूनच माझ्याशी बोलायला लागलं... "अगं, तुझं इतका वेळ जे सूर्यास्त-पुराण चालू आहे, त्याबद्दलच मगाशी तुझा मुलगा तुला काहीतरी सुनावून गेला ना! मग त्याच्यावर कश्याला चिडलीस? "... ते ऐकून मी चपापले। (दुसरं मन जेव्हा असं आरश्यातून किंवा फोटोतून आपल्याशी बोलतं तेव्हा चपापायचं असतं.)
... माझ्या नकळत मी ते फोटो मोजायला सुरूवात केली आणि माझ्या लक्षात आलं की आत्तापर्यंत मी तसे तब्बल सत्त्याण्णव फोटो काढले होते! माझा माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसेना! सूर्यास्ताचे सत्त्याण्णव फोटो??... "प्रत्येक फोटोत तोच तो सूर्याचा केशरी गोळा... त्याच त्या आकाशातल्या रंगांच्या छटा...!!! पुनःप्रत्ययाचा आनंद किती वेळा घ्यायचा त्याला काही सुमार आहे की नाही? " - माझ्या भित्ती-मनाला पुन्हा वाचा फुटली। (मी सगळे फोटो मोजेपर्यंत बरं गुपचूप उभं होतं!)
... घाईघाईनं उठून मी माझ्या त्या फोटोप्रेमी भावाला फोन लावला। माझं सगळं ऐकून घेऊन तो शांतपणे म्हणाला, "फार काही वाईट वाटून घेऊ नकोस, माझंही तुझ्यासारखंच झालंय... मी आता त्या सगळ्या फोटोंची रद्दी घालणार आहे! मराठी-इंग्रजी वर्तमानपत्रांपेक्षा त्याला नक्कीच चांगला भाव मिळेल. "... आणि आम्ही दोघं खो-खो हसत सुटलो.

सूर्यास्ताच्या फोटोंचा खच पाडणारी मी एकटीच नाहीये हे कळल्यावर मला जरा बरं वाटलं। त्या आनंदातच मी तो ’फोटोच फोटो चहूकडे... ’चा सगळा पसारा आवरला. आता लवकरच या फोटोंची शंभरी भरेल... मग मी अगदी रद्दी जरी नाही तरी त्यांचं एक प्रदर्शन भरवावं म्हणते!

अरे, वाजले किती? माझ्या एका मैत्रिणीनं नवीन घर घेतलंय, ते बघायला जायचंय... घराच्या गच्चीतून सूर्यास्त फार छान दिसतो असं सांगत होती... कॅमेरा री-चार्ज केला पाहिजे...

-------------------------------------------------------

('स्त्री' मासिकाच्या ऑगस्ट-२०१० च्या अंकात हा लेख प्रकाशित झाला.)

Comments

Khar tar tumachyaa Profile madhye paN suryastaachaa photo asaayalaa hawaa hotaa....-:)

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)